ताज्या घडामोडीराजकीय

केज नगरपंचायतीत खळबळ पत्रकाराच्या नावे घरकुल निधीवर डल्ला; भ्रष्टाचाराचा ‘कळस’ उघड!


केज नगरपंचायतीत खळबळ पत्रकाराच्या नावे घरकुल निधीवर डल्ला; भ्रष्टाचाराचा ‘कळस’ उघड!

 

केज / प्रतिनिधी 

नगरपंचायत पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गरिबांच्या हक्काच्या घरासाठी असलेल्या पंतप्रधान आवास योजनेवर डल्ला मारताना चक्क एका पत्रकाराच्या नावाचा वापर करून निधी हडपल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे नगरपंचायतीचा कारभार ‘भ्रष्टाचाराचे माहेरघर’ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

​मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थी क्रमांक २२७ म्हणून पत्रकार प्रकाश एकनाथ मुंडे यांच्या नावाला २०१८-२०१९मध्ये मंजुरी मिळाली होती. मात्र, प्रकाश मुंडे यांना या योजनेचा कोणताही लाभ मिळाला नाही किंवा त्यांच्याकडे घराचे बांधकामही झाले नाही. तरीही, तत्कालीन मुख्याधिकारी, संबंधित विभागाचे कर्मचारी आणि काही स्थानिक पुढाऱ्यांनी संगनमत करून प्रकाश मुंडे यांच्या नावावर आलेला शासकीय निधी बेकायदेशीररीत्या २०२१-२०२२ मध्ये उचलला आहे.

​भ्रष्टाचाराची ‘मोडस ऑपरेंडी’

शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याऐवजी, लाभार्थ्यांच्या नावावर परस्पर रकमा लाटण्याचे मोठे रॅकेट नगरपंचायतीत सक्रिय असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण दाखवून प्रत्यक्ष लाभार्थ्याला अंधारात ठेवले गेले. हा प्रकार केवळ फसवणूक नसून शासनाच्या तिजोरीवर पडलेला दरोडा असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

​दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी

​या गंभीर प्रकारामुळे केजमधील पत्रकार संघटना आणि नागरिक आक्रमक झाले आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात असून, यात आणखी किती जणांचे बळी दिले गेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

​”पत्रकाराच्या नावावर जर असा डल्ला मारला जात असेल, तर सामान्य माणसाची अवस्था काय असेल? या प्रकरणाची सखोल चौकशी करून तत्कालीन मुख्याधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत.”  स्थानिक नागरिक व पत्रकार संघटना.

प्रशासनाची भूमिका काय असणार?

​आता या प्रकरणाचा चेंडू प्रशासनाच्या कोर्टात आहे. वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींना जेलची हवा दाखवणार की नेहमीप्रमाणे कागदोपत्री घोडे नाचवून प्रकरण दडपले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर या आरोपांना ठोस दुजोरा मिळाला, तर अनेक बड्या धेंडांचे धाबे दणाणणार हे निश्चित!


महानेता NEWS

मुख्य संपादक :-श्रीराम तांदळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *