क्राईम

सोनीजवळ्यात उपसरपंचाच्या दिराने स्वतः च्या शेतात बसविला एक्सप्रेस फिडर गावठाण डीपी ; इतरांना वीज जोडणीस केला मज्जाव


महावितरणच्या अभियंत्यांकडे तक्रार ; सात महिन्यापासून काहीच कार्यवाही नाही

केज : प्रतिनिधी

सोनीजवळा (ता.केज) येथील कोकाटे वस्तीला शासकीय गावठाण एक्सप्रेस फिडर विद्युत डीपी मंजूर झाला होता.तो डीपी सार्वजनिक जागेवर न बसविता उपसरपंचाच्या दिराने स्वतःच्या शेतात बसविला आहे.तर डीपीवरून इतरांना वीज जोडणी घेण्यास मज्जाव केला असून स्वतःच्या शेतातील विहिरीवरील विद्युत मोटारीसाठी विजेचा वापर केला जात आहे.परंतु एक्सप्रेस फिडर वर शेतीसाठी वापर करता येतो का?अशी तक्रार महावितरणच्या अभियंत्यांकडे देऊन सात महिन्याचा कालावधी लोटला तरी अद्याप कार्यवाही केलेली नाही.

सोनीजवळा या गावात असलेल्या कोकाटे वस्तीवरील नागरिकांसह शेतकऱ्यांना घरगुती आणि शेतीच्या विद्युत पुरवठ्यासाठी या वस्तीला शासकीय विना मूल्य एक्सप्रेस फिडर गावठाण डीपी मंजूर झाला होता.हा डीपी सार्वजनिक ठिकाणी न बसविता या गावच्या उपसरपंचाचे दिर बाळासाहेब सोपान कोकाटे यांनी स्वतःच्या शेतात बसविला आहे.या डीपीवर त्यांनी स्वतःच्या शेतातील विहिरीवरील विद्युत मोटारीसाठी जोडणी करून विजेचा वापर करीत आहेत.तर या डीपीवरून विद्युत जोडणी घेण्यासाठी शिवाजी गुणवंत कोकाटे व गोविंद सोमनाथ कोकाटे या दोघांनी ३७ हजार पाचशे रुपये दिले होते.मात्र गोविंद यांचे १२ हजार पाचशे परत करीत शिवाजी यांचे २५ हजार रुपये परत दिले नाहीत.ते महावितरणकडे केलेली तक्रार परत घेत नाहीत.तोपर्यंत पैसे दिले जाणार नाहीत,असे म्हणत आहेत.

या दोघांना घरगुती विद्युत कनेक्शन घेऊ दिले नसून या डीपीवर पैसे दिल्याशिवाय कोकाटे वस्तीवरील एका ही व्यक्तीला विद्युत कनेक्शन घेऊ देणार नाही. अशी धमकी देतात व खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकी देत भांडणास अंगावर धावून येत आहेत.त्यामुळे सदरचा डीपी काढून सार्वजनिक ठिकाणी बसविण्यात यावा.आम्हाला रितसर कोटेशन भरुन कनेक्शन देण्यात यावे,अशी मागणी शिवाजी गुणवंत कोकाटे व गोविंद सोमनाथ कोकाटे यांनी विद्युत महावितरणच्या अभियंत्याकडे केली आहे.या संदर्भात २८ मे २०२५ रोजी अर्ज देऊन ही महावितरणच्या अभियंत्यांनी कार्यवाही केली नसल्याने हे दोघे विद्युत जोडणीपासून वंचित आहेत.


महानेता NEWS

मुख्य संपादक :-श्रीराम तांदळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *