महाराष्ट्र

केज नगरपंचायत ‘घरकुल’ निधीत ३.६२ कोटींचा झोल; दोषींवर फौजदारी कारवाईसह व्याजासह वसुली होणार!


​केज नगरपंचायत ‘घरकुल’ निधीत ३.६२ कोटींचा झोल; दोषींवर फौजदारी कारवाईसह व्याजासह वसुली होणार!

​राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची विधानसभेत घोषणा; गरज भासल्यास ‘एसआयटी’ चौकशीचेही दिले संकेत

​  केज प्रतिनिधी  

बीड जिल्ह्यातील केज नगरपंचायतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या निधीत झालेल्या ३.६२ कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारने कठोर पवित्रा घेतला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी , ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, तसेच अपहार केलेली रक्कम व्याजासह वसूल केली जाईल, अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.

​आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना मिसाळ यांनी ही माहिती दिली.

​नेमके प्रकरण काय?

​केज नगरपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (शहरी) ३७४ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली होती. यासाठी:

​केंद्र सरकारचा निधी: २ कोटी २४ लाख ४० हजार रुपये

​राज्य सरकारचा निधी: ३ कोटी ६२ लाख रुपये

​एकूण प्राप्त निधी: ५ कोटी ८६ लाख ४० हजार रुपये

​नियमानुसार हा निधी राष्ट्रीयीकृत बँकेत जमा करणे बंधनकारक असताना, तो महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जमा करण्यात आला. यापैकी ११६ लाभार्थ्यांना १ कोटी ६७ लाख ७५ हजार रुपये वितरित झाले, मात्र उर्वरित ४ कोटी २८ लाख २५ हजार रुपयांचा लाभार्थ्यांना पत्ताच नाही. हा निधी इतरत्र वळवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

​आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास; ‘एसआयटी’चाही विचार

​राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले की, या व्यवहाराशी संबंधित कोणतेही लेखे (Accounts), व्हाउचर्स किंवा स्पष्ट बँक स्टेटमेंट उपलब्ध नाहीत, ही गंभीर बाब आहे.

​विभागीय चौकशी: या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

​EOW तपास: आर्थिक गुन्हे शाखेच्या (Economic Offences Wing) माध्यमातूनही याचा तपास केला जाईल.

​SIT ची शक्यता: प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, गरज भासल्यास विशेष तपास पथक (SIT) नेमण्याचा विचार सरकार करेल.

​”गरिबांच्या घरांसाठी असलेल्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांना सोडले जाणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी समिती गठीत केली असून येत्या आठ दिवसात अहवाल येताच कडक कारवाई केली जाईल.”

— माधुरी मिसाळ, नगरविकास राज्यमंत्री

​या चर्चेत आमदार सुधीर मुनगंटीवार आणि हरिष पिंपळे यांनीही सहभाग घेऊन प्रशासकीय अनागोंदीवर ताशेरे ओढले.

​


महानेता NEWS

मुख्य संपादक :-श्रीराम तांदळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *